मुंबई दि.2 – भारतीय क्रिकेट संघाचा तुफानी फलंदाज रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहेत. धवल कुलकर्णी याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विचारविनिमय केला.
धवल कुलकर्णी आणि ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी सोमवारी सायंकाळी मुंबई येथे अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत कुलकर्णी आणि दहिवल यांनी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरु करण्याबाबत अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान धवल कुलकर्णी याने यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली आणि नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. अकादमीच्या उभारणीबाबत चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.