बीड दि.3 – तालुक्यातील रत्नागिरी येथे शाळेत गेलेल्या एका सहा वर्षीय मुलाचा शाळेच्या आवारात मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास निदर्शनास आली असून त्याचा गळा दाबून खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांनी सदरील मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती दिली. नेकनूर जवळील रत्नागिरी येथील धनराज सपकाळ सकाळी आपल्या बहिणी सोबत शाळेत गेला होता. सकाळी साडे आकाराच्या सुमारास धनराज गायब झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. सदरील घटना घडल्यानंतर मुलास नेकनूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.
धनराजचा गळा दाबून खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. धनराजच्या गळ्याभोवती गळा आवळल्याच्या खुणा असल्याचे सांगितले असून नातेवाईकांनी त्याचा खून झाल्याचा आरोप केला आहे.