बीड दि.4 – तालुक्यातील नेकनूर पासून जवळच असलेल्या रत्नागिरी गावामधील शाळेच्या आवारात काल (दि.०३) सकाळी अकरा वाजता सहा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला होता. अंबाजोगाई येथील रुग्णालयात त्याच्या उत्तरिय तपासणीत गळ्याला दाब पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून नेकनूर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
धनराज मोतीराम सपकाळ (वय 6) हा बुधवारी आपल्या बहिणीसोबत शाळेत गेला होता. सकाळी 11 वाजता त्याचा मृतदेह शाळेच्या परिसरात आढळून आल्यानंतर नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता व नातेवाईकांनीही घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. धनराज सपकाळचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला होता.
दरम्यान रात्री उशिरा अहवाल आला असून यात त्या बालकाचा गळा आवळाल्याने मृत्यु झाला असल्याचे म्हटले आहे. सपोनि लक्ष्मण केंद्रे हे याप्रकारणाचा पुढील तपास करीत आहेत.