बीड दि.4 – नेकनूर पासून येथून जवळच असलेल्या रत्नागिरी गावातील एका ६ वर्षीय बालकाचा काल मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केला होता. नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने करीत प्रकरणाचा उलगडा केला असून करणीच्या संशयातून ‘त्या’ बालकाचा खून झाले असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
नेकनूरपासून जवळ असलेल्या रत्नागिरी येथील शुभम (उर्फ राज) सपकाळ या ६ वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली. शुभमच्या कुटुंबियांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.बुधवारी रात्री उशिरा अहवालातून त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करत सपकाळ यांच्या भावकीतील रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला ताब्यात घेतले. यावेळी या दोघांनीही जुन्या भांडणातून ‘त्या’ बालकाचा खून केला असल्याचे सांगितले. ‘आमच्या म्हैसला करणी करून तिला ठार मारण्यात आले होते आणि त्याचा बदला म्हणून आम्ही त्याला ठार मारले असल्याचे’ त्यांनी पोलिसांना सांगितले. रोहिदास सपकाळ यांचे घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असून बुधवारी शुभम शाळेला आला असता त्याला उचलून रोहिदास यांनी स्वत:च्या घरामध्ये नेले आणि तिथेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आणून टाकला असल्याची कबुली पोलिसांनी दिली.