केज दि.७ – साखर कारखान्याहुन कधी आला ? अशी विचारणा केल्यावरून एका तरुणाचे शिवीगाळ करून दगडाने मारहाण करीत डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील भोपला शिवारात घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील हदगाव येथील विनोद विठ्ठल यादव ( वय ३० ) व या गावातील आरोपी प्रकाश रामभाऊ वाघमारे या दोघांची रविवारी ( दि. ७ ) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास भेट झाली. यावेळी विनोद याने तू साखर कारखान्याहून कधी आलास अशी विचारणा केली असता तुला काय करायचय मी कधी पण येईन असे म्हणत प्रकाश वाघमारे याने शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करीत डोके फोडले. विनोद यादव यांच्या फिर्यादीवरून प्रकाश वाघमारे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.
अन्य एका घटनेत माहेरी असलेल्या पत्नीस आणण्यासाठी आलेल्या पतीस सासुरवाडीत पत्नी, सासऱ्यासह नातेवाईकांनी बेदम मारहाण करीत दगडाने डोके फोडल्याची घटना सासुरा ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील देवगाव येथील केशव महादेव नागरगोजे यांची पत्नी श्रीदेवी ही माहेरी सासुरा येथे आईवडिलांकडे राहत आहे. त्यामुळे पत्नीला आणण्यासाठी केशव नागरगोजे हे आपल्या आईवडिलांना घेऊन शनिवारी ( दि. ६ ) सकाळी सासुरवाडीला गेले होते. त्यांनी पत्नीला नांदण्यास पाठविण्याची सासऱ्याकडे मागणी केली असता सासरे महपती वैजनाथ पाळवदे यांनी दगड उचलून जावईबापूच्या डोक्यात घातला. त्यामुळे केशव नागरगोजे यांचे डोके फुटले. तर काशीनाथ वैजनाथ पाळवदे, गयाबाई महपती पाळवदे, श्रीदेवी केशव नागरगोजे, क्रांती महपती पाळवदे, सुमित्रा गोवर्धन ढाकणे, बापूराव काशीनाथ पाळवदे यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्याने बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी केली. केशव नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सानप हे पुढील तपास करीत आहेत.