नेकनूर दि.११ – पद, प्रतिष्ठा आणि पैसा यापेक्षाही जीवनात आत्मिक समाधान देणाऱ्या कित्येक गोष्टी असतात हे ज्याला वेळेवर कळते तोच जीवनाचा पुरेपूर आनंद घेतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामध्ये सेवाभाव जपताना आपण कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे पण वेळीच उमगले पाहिजे. आणि अशीच उमज आणि समज आलेला अधिकारी आपल्या कर्तव्य बजावताना सेवाभावही जपतो आहे याची प्रचिती बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे येत आहे.
संत गाडगेबाबांनी कित्येक वर्षांपूर्वी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हाती झाडू घेत समाजप्रबोधन आणि परिवर्तन करण्याचा ध्यास घेतला होता. मात्र बहुतांश वेळी आणि ठिकाणी स्वच्छते बाबत उदासीनता पाहायला मिळते. त्यातली त्यात शासकीय कार्यालयात स्वच्छतेचा अभाव असतो. मात्र त्याला नेकनूर पोलीस स्टेशन अपवाद आहे. या ठाण्याला लाभलेले लक्ष्मण केंद्रे हे अधिकारी रुजू झाल्यापासून विधायक कामांसाठी परिचित आहेत. मग ते डोंगरावर जाऊन वृक्षारोपण असो की ठाण्यात आलेल्या पीडितांना दिलासा देणे असो.
दरम्यान नेकनूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी जेव्हा पोलिस स्टेशनची साफसफाई व स्वच्छता करतात तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटते. पोलीस अधिकारी व कर्मचारी म्हटले की सर्वांनाच त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर असतो. त्यांचे रुबाबदार राहणीमान व त्यांची समाजाला असलेली गरज त्यामुळे सर्वांनाच पोलीस म्हटले की एक भीतीच मनात बसलेली असते. अनेक जण पोलीस स्टेशन कडे पाहत सुद्धा नाहीत. मात्र हीच भीती कमी करण्याचा प्रयत्न सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केला आहे. आणि माझे कार्यालय स्वच्छ कार्यालय या मोहिमे अंतर्गत सकाळी सकाळी एपीआय लक्ष्मण केंद्रे आणि त्यांचे इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन ची साफसफाई व स्वच्छता करताना दिसून येत होते. कोणी झाडून मारत होते, कोणी पाणी मारत होते, कोणी पाण्याच्या टाक्या स्वच्छ करत होते तर कोणी इतर वस्तूंची साफसफाई करताना दिसून येत होते. हे सर्व होत असताना पाहणाऱ्यांना सुखद आश्चर्य वाटल्या शिवाय राहिले नाही.
आपण जिथे राहतो अश्या पोलीस स्टेशन मध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच आपल्या पोलीस ठाण्याची साफसफाई करण्याचा आणि स्वच्छता ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये सर्व जण सहभाग घेणार आहेत. जिल्ह्यासाठी ही नक्कीच प्रेरणादायी गोष्ट तर आहेच. आणि यातून कुठलेच काम कमी अथवा हलके नसते याचाही आदर्श समोर येतो आणि श्रमालाही प्रतिष्ठा मिळते.