सातारा दि.12 – सरपंचपद मिळवण्यासाठी लोक काय काय करत नाहीत ? कुठे बोली लागते तर कुठे मुलगा बापाच्या, कुठे बायको नवऱ्याच्या विरोधात जाऊन राजकारणासाठी कुटुंब विस्कळीत करतात. मात्र महाराष्ट्रातील एका गावात मात्र सरपंचपद म्हटलं की लोक नको नको म्हणायचे आणि याला कारणही तसेच होते. मात्र एका रणरागिनीने पुढे येत अंधश्रधेच्या मुळावर घाव घालत गावगाडा हाकण्यास सुरुवात केली आहे.
साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावात गेल्या 20 वर्षापासुन सरपंचपद अंधश्रद्धेमुळे रिक्त होते. सरपंचपदावर बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो, अशी अंधश्रद्धा या गावात होती, त्यामुळे या पदावर बसण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. अखेर एका महिलेनं यासाठी पुढाकार घेत, ही अंधश्रद्धा असल्याचं दाखवून दिलं आहे. शितल विश्वास राजपुरे असं या महिलेचं नाव असून त्यांनी स्वतः पुढं येत गावच्या सरपंचपदाची जबाबदारी घेतली आहे. गावाला सरपंच मिळणार असल्याने गावाकऱ्यांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला.
दरम्यान शितल यांच्या निर्णयाचं आता संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डाॅ. हमीद दाभोळकर यांनी या गावाला भेट देऊन धाडसी सरपंच शितल राजपुरे यांचा सत्कार केला आहे.