मुंबई दि.१२ – परळी येथील पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होती. मात्र अजूनपर्यंत कोणीही थेट कोणत्या नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. आता मात्र भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव घेत याप्रकरणावरून त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.
भाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणं, घोषणा करणं सोपं असतं! एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय? ताबडतोब कारवाई करा, असं आवाहन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. त्यांनी या संदर्भात काही ट्विट केले आहेत.
दरम्यान पूजा चव्हाणच्या परीवारावर दबाव असू शकेल. पोलिस अशा केसेस सुमोटो दाखल करून घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नकोचं. अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.