पुणे दि.१३ – बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पूजा चव्हाण प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारमधील संजय राठोड नामक मंत्र्याचं नाव घेतलं जात असल्यानं या प्रकरणाला वेगळेच वळण मिळालं आहे. मात्र तरीही पोलिसांकडून अद्याप कारवाई केली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं असले तरी पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही, याचं गुपित आता समोर आलं आहे.
पूजा चव्हाणच्या कुटुंबियांकडून अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यू नोंद केलेली असून हा तपास इथपर्यंतंच सीमीत आहे. पूजा इंग्रजी संभाषण कौशल्य कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि आणखी एका मित्रासोबत महमंदवाडी भागातील हेवन पार्क सोसायटीत राहात होती. याच ठिकाणी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत तीनं आत्महत्या केली होती. या प्रकरणात एका मंत्र्यानं नाव आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
तसेच संबंधित तरुणी आत्महत्या करण्यापूर्वीचे तसेच तीने आत्महत्या केल्यानंतरचे काही फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत. भाजपने देखील या प्रकरणात लक्ष घालून संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरलेली आहे, मात्र अद्याप कुटुंबियांकडूनच तक्रार करण्यात न आल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
पुण्याचे पोलीस आयुक्त उद्धव ठाकरे यांच्या भेटीला.…..!
दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी केलेली कारवाईची मागणी आणि सोशल मीडियातून उमटलेल्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.