बीड दि.१३ – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई होण्यासाठी रान उठवले जात असताना बंजारा समाजाचे नेते मात्र वेगळीच भूमिका मांडताना दिसत आहेत. प्रकरणाची खातरजमा न करताच समाजातील नेत्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र आमचा समाज खपवून घेणार नाही, असा इशारा बंजारा नेत्यांकडून देण्यात आला.
यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंजारा समन्वय समितीकडून निवेदन पाठवण्यात येणार आहे. 15 तारखेला सेवालाल महाराज जयंतीनंतर प्रत्यक्ष निवेदन देण्यात येईल. तसेच गरज पडल्यास याविरोधात आंदोलन करण्याचीही आमची तयारी असल्याचे बंजारा समन्वय समितीचे नेते ना.म. जाधव यांनी सांगितले.
गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आज सकाळीच बंजारा समाजाचे नेते मनीष जाधव यांनी पूजाला न्याय मिळवून द्यायची मागणी केली होती. बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा पुण्यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन शेतकरी नेते आणि विमुक्त घुमंतू जनजाती महासभा प्रदेशाध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले होते.