अलिबाग, जि.रायगड,दि.13 – दहावी-बारावीच्या परीक्षेत कोकण विभागातील विद्यार्थी नेहमीच बाजी मारतात. त्यातील अनेकजण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात. मात्र, या कोकणच्या मातीतील विद्यार्थी सनदी अधिकारी अर्थात आयएएस,आयपीएस होण्यात तितकासा रस घेताना दिसून येत नाहीत, आणि मग यशस्वी हाेण्यात मागे पडतात. आगामी काळात कोकणच्या मातीतून सनदी अधिकारी घडावेत,” असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
पुण्यातील प्रथितयश सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व रोहा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सभागृह, राेहा येथे काल (दि.12 फेब्रुवारी राेजी) आयोजित कार्यक्रमात त्या बाेलत हाेत्या. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा शकुंतला काळे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या साेहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि गांधी अभ्यासक अरुण खोरे होते. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे, वरिष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे कु.आदिती तटकरे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा शकुंतला काळे यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’, तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सुदर्शन केमिकल्सच्या सीएसआर विभागाच्या प्रमुख शिवालिका पाटील-विवेक गर्ग, वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. शंतनू आठवले, वरिष्ठ पत्रकार भारत रांजणकर, पोलीस कर्मचारी दत्तात्रय महाडिक यांना ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. .
या कार्यक्रमातील पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रा.डॉ. संजय चोरडिया यांनी येथील मुलांसाठी ‘सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान’च्या सहकार्याने स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करणार असल्याची घोषणा केली.
पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “कोकणात स्पर्धा परीक्षांविषयी जास्त जागरूकता नाही. त्यामुळे पारंपरिक नोकरी-व्यवसायाकडे जाण्याचा येथील मुलांचा कल असतो. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देऊन सनदी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पुरस्कार-सत्कार हे आपल्या कामगिरीचे कौतुक व पुढच्या कामासाठी प्रेरणा असतात. त्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या यशातील सातत्य ठेवत नवनवी यशशिखरे गाठावीत. शिक्षणासोबतच आपल्या गुरुजनांचा, पालकांचा, शाळेचा आदर ठेवत त्यांच्याप्रती कृतज्ञ राहून चांगला माणूस बनावे.”
डॉ. शकुंतला काळे म्हणाल्या, “अलिकडे दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश पाहून आनंद वाटतो. पण हे यश पुढील शिक्षणातही कायम राहावे. आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक सोयी-सुविधा, संसाधने, माहितीचा साठा उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेत यशस्वी बनावे. बोर्डात गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी पुढे नेमके काय करतात, हा मला नेहमी प्रश्न पडतो. त्यांच्या नोंदी ठेवून त्यावर संशोधन व्हायला हवे. जीवनात यशस्वी होण्याबरोबरच एक चांगला नागरिक होण्यासाठी जीवनमूल्यांची शिकवणही तितकीच महत्वाची असते.”
अरुण खोरे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे यश आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद आहे. या दोहोंना एकत्रितपणे सन्मानित करून सूर्यदत्ता संस्थेने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. जीवनात मूल्याधिष्टीत शिक्षणाला अतीव महत्व आहे. लोकशाहीची आणि जीवनाची मूल्ये आपण आत्मसात करायला हवीत. शेतकरी, समाजातील वंचित, गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असते. पत्रकारांनी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत प्रामाणिपणे काम केले पाहिजे. सोशल मीडियामुळे आज कोणतीही लपवाछपवी चालत नाही, हे आपण ध्यानात घ्यायला हवे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते अतूट असते. करोना काळात आपण ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले. मात्र, त्यात ऑफलाईन शिक्षणासारखी मजा नाही. आपुलकीचा अभाव त्यात जाणवतो. आता पुन्हा नॉर्मल होताना आपण ऑफलाईनकडे जात आहोत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा आढावा घेतला तर अनेक नव्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नवनवे अभ्यासक्रम, व्यवसाय आणि रोजगाराची दालने खुली झाली आहेत. सूर्यदत्ता अशा उदयोन्मुख गोष्टींना प्राधान्य देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे शिक्षण देते.”
राेहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी स्वागत-प्रास्ताविकात रोहा प्रेस क्लबच्या उपक्रमांविषयी, तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे माध्यम समन्वयक जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले.