Site icon सक्रिय न्यूज

माजी सरन्यायाधीशांचे धक्कादायक वक्तव्य…….!

माजी सरन्यायाधीशांचे धक्कादायक वक्तव्य…….!
नवी दिल्ली दि.14 – देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असे विधान माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी शनिवारी केले.एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी  न्यायालयात जाणे पश्चात्ताप करून घेण्यासारखे आहे, अशी टिप्पणी केली.

गोगोई यांनी त्यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपाचा निवाडा स्वत:च केला होता, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का, या निवेदकाच्या प्रश्नावर गोगोई म्हणाले, की मोठय़ा कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणे परवडते, इतरांना नाही. जर तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही.

           न्यायव्यवस्थेबद्दल ते म्हणाले, ‘‘आपल्या देशाला पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था हवी आहे, पण आपली न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. जेव्हा संस्थांची कार्यक्षमता कमी होते तेव्हा वाईट अवस्था असते. २०२० हे करोनाचे वर्ष होते. त्यात कनिष्ठ न्यायालयात साठ लाख, उच्च न्यायालयात ३ लाख, सर्वोच्च न्यायालयात सात हजार खटल्यांची भर पडली.’’ तसेच कामासाठी योग्य व्यक्ती मिळणे महत्त्वाचे आहे. सरकारमध्ये अधिकारी नेमतात तशी न्यायाधीशांची नेमणूक होत नाही. न्यायाधीशाची पूर्ण काळ वचनबद्धता असते. कामाचे तास निश्चित नसतात. २४ तास काम करावे लागते. पहाटे २ वाजता आम्ही काम केले आहे. न्यायाधीश सर्वकाही बाजूला ठेवून काम करतात. किती लोकांना याची जाणीव आहे? जेव्हा न्यायाधीश नेमले जातात तेव्हा त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे, असेही गोगोई म्हणाले.
           दरम्यान अयोध्या आणि राफेल प्रकरणी निकालात राज्यसभेच्या जागेचा सौदा केलात का, या प्रश्नावर गोगोई म्हणाले, ‘‘भाजप सरकारच्या बाजूने मी हे निकाल दिले असे म्हटले जाते, पण त्या निकालांचा आणि राज्यसभेची खासदारकी याचा संबंध नाही.
शेअर करा
Exit mobile version