केज दि.१४ – दगडाने कारची समोरील बाजूची काच फोडून कारच्या डिकीत ठेवलेली सोन्याची अंगठी, घड्याळ आणि ४२ हजार रुपायांची रोकड असा ५१ हजार रुपायांचा ऐवज तिघांनी लंपास केला. तर काच फुटल्याने १० हजार रुपायांचे नुकसान झाले. ही घटना केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे १४ फेब्रुवारी रोजी रात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास घडली असून केज पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचोली ( माळी ) येथील मधुकर दगडू सोनवणे हे पळसप ( ता. जि. उस्मानाबाद ) येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असून मुरुड ( ता. जि. लातूर ) येथे वास्तव्यास आहेत. वडिलांच्या मासिकासाठी मधुकर सोनवणे हे पत्नी, सून आणि बहीण यांना कारने ( एम. एच. २५ एएल ७२२२) घेऊन १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चिंचोलीमाळी या गावी आले होते. ते रात्री ही कार घरासमोरील मोकळ्या जागेत लावून त्यांचा पुतण्या रमेश सोनवणे यांच्या घरी झोपले होते. १४ फेब्रुवारी रोजी रात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास काच फुटल्याचा आवाज आल्याने ते झोपेतून जागे होऊन घरातून कारकडे निघाले असता कारजवळ अंगावर पांढरे कपडे असलेला एक इसम तर दोघे कारपासून लांब दिसून आले. ते कारजवळ आले असता त्यांचा भाचा दत्ता हरिकिशन कांबळे ( रा. चिंचोलीमाळी ) व इतर अनोळखी दोघे त्यांना पाहून पळून गेले. कारजवळ जाऊन पाहिले असता कारच्या समोरील काच फुटलेला आणि काचेवर दगड तसाच ठेवलेला आढळून आला. तर कारच्या डिकीत ठेवलेले सोन्याची अंगठी, घड्याळ आणि नगदी ४२ हजार रुपायांसह आधार, एटीएम, पॅन कार्ड गायब असल्याचे दिसून आले. तर कारची समोरची काच फुटल्याने १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मधुकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता हरिकिशन कांबळे व इतर अनोळखी दोघांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.