औरंगाबाद दि.१५ – कोरोना प्रतिबंधासाठी सध्या कुणीही मास्क घालत नाही हे धोक्याचे आहे. मात्र मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणाले. रुग्ण वाढत असल्यानं कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले असून उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून या संदर्भात येत्या दोन दिवसांत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.
तसेच काही लोक कोरोनाबाबत विनाकारण राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली. पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये, असंही अजित पवार म्हणाले. कोरोना पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमावली लावली पाहिजे, मी मुंबईला गेल्यानंतर राज्य प्रमुखांशी बोलून तातडीने निर्णय घेऊ, असेही अजित पवार म्हणाले.