नागपूर दि.१७ – राज्यातील कांही भागात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये तर मेडिकल कॉलेजलाच कोरोनाने विळखा घातला आहे. नागपूर मेडिकल कॉलेजमधील 30 डॉक्टर्स, तीन नर्ससह एकूण 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सदरील मेडिकल कॉलेजमधील कोरोना बाधितांचा आकडा 38 वर गेला आहे. यामध्ये डेंटल महाविद्यालयातील 9, एमबीबीएसच्या 12, पीजी करणाऱ्या 9 आणि तीन स्टाफ नर्सचा समावेश आहे. यातील अनेकजण हे लक्षण नसलेले आहेत. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना भरती करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेज सुरू झाल्याने वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी आले होते. त्यामुळे या ठिकाणी येऊन त्यांना संक्रमण झालं. आता खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्टेल सॅनिटाइझ करण्यात आलं आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी दिली.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झालीय. कुटूंबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला. पुण्याहून घरी आल्यावर त्यास ताप आल्यानंतर तपासणी केली असता कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर कुटूंबातील इतरांची तपासणी केल्यानंतर तरुणासह एकुण 10 जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.