पुणे दि.१७ – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मागील काही दिवसांपासून अनके नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करत नसल्याचा आरोप केलेला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तपास अहवाल सादर केला आहे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा संजय राठोड यांचाच आहे, असा दावा भाजपने केलेला आहे. त्यामुळे पूजाच्या आत्महत्या प्रकरणात निष्षक्ष चौकशी करुन राठोड यांची हकालपट्टी करा अशी मागणी भाजप सातत्याने करत आहे. तसेच, पोलीस या प्रकरणी निष्पक्षपणे तपास करत नसल्याचेही भाजपने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी एक अहवाल सादर केला आहे. अहवालाच्या प्रति राज्याचे पोलीस महासंचलक तसेच राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवण्यात आल्या आहेत. असे असले तरी या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नसल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस निष्पक्षपणे तपास करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असला तरी, राज्यात एकूण तीन पथकांकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तपास सुरु आहे. ही तिन्ही पथकं राज्यातल्या वेगवेगळ्या भागात तपास करत आहेत.