नवी दिल्ली दि.१७ – भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कधीही कोणत्याही महिलेला फाशी दिली गेली नाही. मात्र, आता एका महिलेला फाशी दिली जात आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे राहणाऱ्या शबनम या महिलेने 2008 मध्ये प्रियकरासोबत मिळून कुटुंबातील 7 जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली होती. यामध्ये ही महिला दोषी ठरली असून, आता तिला फाशी दिली जाणार आहे.
शबनम या आरोपी महिलेने फाशी शिक्षा कमी व्हावी, यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तिला कोणताही दिलासा न देता फाशीची शिक्षा कायम ठेवली. तसेच तिने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडेही दया याचिका दाखल केली होती. पण राष्ट्रपतींनीही ती याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे तिची फाशीची शिक्षा कायम राहिली.
दरम्यान, आरोपी शबनम या महिलेला फाशीची शिक्षा देण्यासाठी तयारी सुरु केली जात आहे. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देणारा जल्लाद पवन याने फाशीघराचे दोनदा निरीक्षण केले आहे. पण सध्या फाशी कधी जाणार याची तारीख निश्चित करण्यात आली नाही. डेथ वॉरंट जारी केल्यानंतर तिला फाशी दिली जाणार आहे.
मथुरा कारागृहात 150 वर्षांपूर्वी महिला फाशीघर बनवण्यात आले होते. मात्र, स्वातंत्र्यानंतर कोणत्याही महिलेला आत्तापर्यंत फाशी दिली गेली नाही. पण आता आरोपी शबनम या महिलेला फाशी दिली जाणार आहे. त्यानुसार, तुरुंग प्रशासनानेही त्याबाबतची तयारी सुरु केली आहे.
वरिष्ठ तुरुंग अधीक्षक शेलैंद्र कुमार मैत्रेय यांनी सांगितले, की या फाशीचा दोर बिहारच्या बक्सर येथून मागविण्यात आला आहे. तसेच जर शेवटच्या क्षणी कोणतीही अडचण न आल्यास शबनम पहिली महिला असेल तिला फाशीची शिक्षा होईल.