Site icon सक्रिय न्यूज

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची वीज ग्राहकांसाठी आणखी एक घोषणा…….!

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची वीज ग्राहकांसाठी आणखी एक घोषणा…….!

मुंबई दि.१९ –  कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा हवेत विरल्यानंतर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुन्हा एक मोठी घोषणा केली आहे. वीज देयकांची थकबाकी वसूल झाल्यावर १०० युनिटपर्यंत वीजमाफीचा विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही घोषणा वीज बिल वसुलीसाठी एक प्रलोभन म्हणून असू शकते अशी चर्चा सुरू आहे.

डॉ.नितीन राऊत यांनी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी एक उच्चस्तरीय समितीही गठित केली होती. परंतु याच काळात राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे समितीची एकही बैठक होऊ नाही. तसेच काम थांबल्याने हा प्रस्तावच तयार होऊ शकला नसल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. कोरोना काळात महावितरणच्या ग्राहकांवरील वीज देयकाची थकबाकी वाढून ७१ हजार कोटींवर गेली. त्यामुळे महावितरण प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. महानिर्मितीलाही कोळसा खरेदी, कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज यंत्रणेवरील विविध खर्चासाठी प्रचंड त्रास होत आहे. या स्थितीत ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणे शक्य नाही.

दरम्यान आता महावितरणकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. ही थकबाकी वसूल झाल्यावर पुन्हा या विषयाचा अभ्यास करून ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा विचार केला जाईल असे डॉ.राऊत यांनी सांगितले. तर कितपत सत्यात उतरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेअर करा
Exit mobile version