Site icon सक्रिय न्यूज

लखन सोनवणे खून प्रकरणी युसुफवडगाव पोलिसांनी पुण्यातून एकास घेतले ताब्यात……!

लखन सोनवणे खून प्रकरणी युसुफवडगाव पोलिसांनी पुण्यातून एकास घेतले ताब्यात……!
केज दि.19 – उस्मानाबाद जिल्ह्यातील पुनर्वसन सावरगाव ( ता. कळंब ) येथील लखन महादेव सोनवणे ( वय २४ ) या तरुणाच्या खून प्रकरणी  युसुफवडगाव पोलिसांनी आकुर्डी ( जि. पुणे ) येथून आरोपीला शोधून शुक्रवारी जेरबंद केले आहे.
       पुनर्वसन सावरगाव ( ता. कळंब ) येथील लखन महादेव सोनवणे ( वय २४ ) या रंगकाम करणाऱ्या तरुणाचा डोक्यात काही तरी वस्तूने मारहाण करून अज्ञात व्यक्तीने त्यास जीवे मारून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह हा माळेगाव येथील शेतकरी तुकाराम गुंठाळ यांच्या केज – कळंब रस्त्यालगत असलेल्या सर्वे नं. ४१ मधील शेतातील पेरूच्या बागेजवळील गव्हाच्या पिकात टाकून दिल्याचे सोमवारी ( ता. १५ ) सकाळी उघडकीस आले होते. मयत लखन याचा भाऊ सतीश महादेव सोनवणे यांनी युसुफवडगाव पोलिसात दिल्यावरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील तरुणाच्या खून प्रकरणात घटनास्थळी पोलिसांना कुठल्याही प्रकारे पुरावे आढळून आले नसल्याने पोलिसांपुढे आरोपीला शोधून काढण्याचे मोठे आव्हान होते. दरम्यान, युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यांनी कळंबपासून घटनास्थळापर्यत वाटेत असणारी सीसीटीव्ही फुटेज तपासली. तसेच सपोनि आनंद झोटे, सपोनि विजय आटोळे, तपासी अधिकारी तथा फौजदार सीमाली कोळी, पोलीस नाईक बालासाहेब ढाकणे, शामराव खनपटे यांनी गावात जाऊन विचारपूस करीत लखन सोनवणे यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढली. तर त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींपैकी कोण गावात हजर नाही अशी गोपनीय माहिती काढून आरोपी निष्पन्न केला. दरम्यान, लखन सोनवणे या तरुणाचा खून त्याचा मित्र साईनाथ जयचंद गायकवाड ( रा. पुनर्वसन सावरगाव ता. कळंब ) याने केल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. तर साईनाथ गायकवाड हा आकुर्डी ( जि. पुणे ) येथे असल्याची माहिती मिळताच सपोनि आनंद झोटे व पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे १८ फेब्रुवारी रात्री पुण्याला रवाना झाले. त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळून शुक्रवारी सकाळी ठाण्यात हजर केले. आरोपी व मयत दोघे मित्र होते, ते दोघे नेहमी एकत्र येऊन दारू घेत असत. त्या दिवशी आरोपीने मयत तरुणास स्कुटीवरून दारू पिण्यास आणले होते. त्याने खून केल्याचे कबुल केले असून त्याने खून का आणि कसा केला याची चौकशी सुरू असल्याची माहिती सपोनि आनंद झोटे यांनी दिली.
शेअर करा
Exit mobile version