Site icon सक्रिय न्यूज

पाण्याच्या हौदात बुडून बालकाचा मृत्यू 

केज दि.२० – एका ३ वर्षीय बालकाचा खेळत जाऊन पाण्याच्या हौदात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील दरडवाडी येथे शनिवारी उघडकीस आली.
     दरडवाडी येथील दिलीप बापूसाहेब दराडे यांचे कुटुंब शेतात वास्तव्यास आहे. शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दराडे दाम्पत्य हे त्यांचा तीन वर्षाचा मुलगा शुभम याला झोपी घालून शेतात काम करीत होते. त्यानंतर झोपेतून उठलेला शुभम हा खेळत – खेळत निघून गेला. दराडे दाम्पत्य घरी आले, तेव्हा शुभम दिसून आला नाही. त्यांनी त्याचा सर्वत्र शोध ही घेतला. मात्र तो मिळाला नाही. शनिवारी सकाळी त्यांचे शेजारी सुरेश रावसाहेब दराडे यांच्या बांधकामावरील पाण्याच्या हौदात शुभम पडला तर नाही ? अशी शंका आल्याने गळ टाकून पाहिले असता शुभमचा मृतदेह गळाला लागला. खेळत – खेळत जाऊन पाण्याच्या हौदात पडल्याने शुभमचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दिलीप दराडे यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version