Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये रिपाइंच्या मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल…….! 

 केज दि.२३ – कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत केज शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
       केज शहरात रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी गायरान जमिनीसह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हयात जमावबंदी आदेश लागु केलेले असल्याने केजचे  पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी १८ फेब्रुवारी रोजी नोटीस काढून मोर्चास परवानगी नाकारली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीपान हजारे, तालुका सचिव दिलीप बनसोडे, शहराध्यक्ष भास्कर मस्के, रिपाई आयटी सेलचे तालुकाध्यक्ष कैलास जावळे, रविंद्र जोगदंड, सुनिल हिरवे यांच्यासह इतर ५ ते १० कार्यकर्त्यांनी सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असताना आपल्या जिवाची व इतरांच्या जिवाची पर्वा न करता हयगयीने व निष्काळजीपणे सोशल डिस्टंसिंगचे कोणतेही पालन न करता  ५० ते ६० महिला व पुरुष यांची गर्दी जमवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसिल कार्यालयावर पायी मोर्चा काढला. त्यांच्या या कृत्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग पसरण्याचा संभव होवु शकतो हे माहिती असताना त्यांनी असे कृत्य केले आहे. अशी फिर्याद पोलीस नाईक मतीन शेख यांनी दिल्यावरून वरील रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांसह इतर ५ ते १० जणांविरुद्ध कलम १८८, २६९, २७०, ३४ भादविसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १७, सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ( ब ) अन्वये केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे ह्या पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version