उस्मानाबाद दि.२४ – पुरोगामी महाराष्ट्रात अधून मधून नवनवीन धक्कादायक आणि तेवढेच घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वी चारित्र्य पडताळणी करण्याच्या प्रकारानंतर पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात एक वेगळा पण धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. परंडा तालुक्यातील देवगाव खुर्द इथं प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर राहिलेली राख चोरणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे.
देवगाव खुर्दच्या ग्रामस्थांनीच या टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीतील दोघांना पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. प्रकरणात पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 2 जणांचा अटक केली असून, 2 जण फरार आहेत. देवगाव खुर्द इथं एका महिलेनं बाळाला जन्म दिला. पण दुर्दैवाने प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या पार्थिवावर 22 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आज स्मशानभूमीत काही लोक अंत्यसंस्कार करत असलेल्या महिलेची राख भरत असल्याचा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.
गावकऱ्यांना ही बाब माहीत झाल्याने त्यांनी तिकडे धाव घेतली.मात्र गावकरी येत असल्याची माहिती मिळताच राख भरणारे दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण दोन जणांना ग्रामस्थांनी राखेच्या पिशवीसह रंगेहात पकडलं. यावेळी ग्रामस्थांनी आरोपींना चांगलाच चोप दिला. काही गावकऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार पोलिसांना कळवला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीसही घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं.
दरम्यान पोलिसांनी अटक केलेले आरोपी माढा तालुक्यातील बारलोणी गावातील असल्याचं उघड झालं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक महिला तर एक पुरुष आहे. पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. हा संपूर्ण प्रकार जादूटोणा करण्यासाठी केला जात असल्याची चर्चा देवगाव खुर्दमध्ये सुरु आहे. मात्र, आरोपी मृत महिलेची राख का घेऊन जात होते, हे पोलिसांकडून अद्याप तरी सांगण्यात आलेलं नाही.
परंडा पोलीस ठाण्यात कलम 297, 379, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिली आहे. परंडा पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत.