परभणी दि.२४ – जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे येथील जिल्हा प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी न केल्यास, थेट कारवाई करण्याचे आदेश येथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये विदर्भातील तब्बल 11 जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच या 11 जिल्ह्यात बसेस तसेच खासगी वाहनाने जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांतून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या तसेच, परभणी जिल्ह्यातून विदर्भातील नमुद 11 जिल्ह्यात जाणाऱ्या खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतची माहिती परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर अकोला जिल्हा प्रशासनाकडूनही परभणीत जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. पूर्व परवानगी घेतल्यास अत्यावशक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे.
दरम्यान, अचानकपणे प्रवेशबंदीचा नियम लागू केल्यामुळे परभणी तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यांतील प्रवाशांची तारांबळ उडाली असून अचानक घातलेल्या बंदीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे.