मुंबई दि.२४ – वीजबिल माफीवरुन वादात सापडलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अखेर राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना सध्या सहसा दिवसा वीज मिळत नाही, त्यामुळे त्यांना रात्री अपरात्री पिकाला पाणी द्यावे लागते. शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात प्रचंड नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, अशी मागणी नेहमी होत होती. मात्र यासंदर्भात ठोस निर्णय मात्र घेतला जात नव्हता. आता यासंदर्भात निर्देश नितीन राऊत यांनी दिले आहेत.कृषिपंपांसाठी ज्या वीज वाहिन्या आहेत. त्या ओव्हरलोड होत असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे वीज वाहिन्यांचे जाळे वाढवणे, रोहित्रांची संख्या तसेच त्यांच्या क्षमतेत वाढ करणे यासह पायाभूत सुविधा वाढविण्यावरही लक्ष देणे, यासोबतच सर्वात महत्त्वाचा आदेश म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळाली पाहिजे, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आणि औद्योगिक ग्राहकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न नितीन राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यात वीजेचे दर कमी असल्याने राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करणे गरजेचे होते. त्यामुळे हे वीजदर किमान १ रुपया प्रति युनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावे आणि सोबतच घरगुती व वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.