बीड दि.26 – कोरोनामुळे 2020 हे वर्ष अत्यंत खडतर गेले. अन्य क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला. दिवाळीच्या सुमारास स्थितीत सुधारणेची लक्षणे दिसू लागल्यावर काही राज्यांनी शाळा आणि महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू केली. पण गेल्या पंधरवड्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा ताण असून त्याच पार्श्वभूमीवर मुलांच्या परिक्षाच न घेण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी याची घोषणा केली आहे. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य विधानसभेत याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, 9, 10वी आणि 11 वीच्या परीक्षा न घेता मुलांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात 19 जानेवारीपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली असून एका वर्गात केवळ 25 विद्यार्थ्यांना प्रवेशाची अनुमती देण्यात आली आहे.