बीड दि.27- ग्रामपंचायत सदस्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यावरून आरोपीतास दोन महिने कारावास व ५,०००/- रूपये दंडाची शिक्षा अंबाजोगाई येथील मा.जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय १ ले श्रीमती एस.एस.सापटनेकर यांनी सुनावली आहे.
थोडक्यात माहिती अशी की, दिनांक १३/०३/२०१३ रोजी सकाळी ११ च्या सुमारास कळंबअंबा ता.केज येथील ग्राम पंचायत कार्यालयात मासिक सभा चालू असताना बालासाहेब ऊर्फ बालाजी बाबासाहेब जगताप रा.कळंबअंबा याने
ग्रामपंचायत मेम्बर सोडून बाकी लोकांना कार्यालयात का बसू दिले ? असे लेखी देणेबाबत वाद घालून कार्यालयातील प्रोसेडींग रजिस्टर फाडून, खुर्त्यांची तोडफोड करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. तसेच ग्रामपंचायत सदस्या या अनुसूचीत जातीच्या आहेत हे माहीत असूनही त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्कयाने मारहाण करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले होते. सदर युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुरनं.३७/२०१३ कलम ३५३,३२३,५०४,३४ भादंवि सह कलम ३ (१)(११) अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता.
सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, ए.एम. डोंगरे यांनी करून तपासांती आरोपीताविरूध्द अंतीम दोषारोपपत्र मा.न्यायालयास सादर केले. प्रकरणाच्या सुनावणीअंती मा.जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने आरोपीतास कलम ३५३ भादंवि प्रमाणे दोषी धरून दोन महिने कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नमूद प्रकरणात सहायक सरकारी वकील एल.बी.फड यांनी सरकारी पक्षाच्या वतीने कामकाज पाहीले तर पोह/१०७० कदम यांनी पैरवीचे कामकाज पाहिले.