अंबाजोगाई दि.२७ – नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिच्या लहान भावास जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून नांदगाव येथील शशिकांत बालासाहेब चव्हाण यास दोषी ठरवून जन्मठेप व 31 हजार रूपये दंड अशी शिक्षा अंबाजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधिश माहेश्वरी पटवारी यांनी शुक्रवारी ठोठावली.सदरील घटना नोव्हेंबर २०१८ साली घडली होती.
अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील शशिकांत बाळासाहेब चव्हाण याने ती एकटी असल्याचे पाहून तिला ओढत शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केला. या बाबत कुठे वाच्यता केलीस तर तुला व तुझ्या लहान भावाला जिवे मारील अशी धमकी देत पिडीत मुलीवर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलीस ठाण्यात शशिकांत चव्हाण याच्याविरूद्ध कलम 376(2)(आय.)(एन) (एफ) 323, 506, भा.द.वि.सह कलम 4,8,10, पोक्सो कायद्यातर्गंत गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणाचा पोलीस तपास बर्दापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केला. व आरोपी विरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आले. सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी आरोपीविरूद्धचे सबळ पुरावे सादर केले. या प्रक्रियेत सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले.
आरोपी विरूद्धचे ठोस पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शशिकांत बालासाहेब चव्हाण यास दोषी ठरवून जन्मठेप व 31 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा तसेच सदरचा दंड हा पिडित मुलीस देण्यात यावा असा आदेश दिला. तसेच समाजकल्याण विभागाच्या वतीने ही इतर मदत पिडीतेस देण्यात यावी अशा सुचना त्यांनी दिल्या. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने ऍड.अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड.एस.व्ही.मुंडे, ऍड.व्ही.एस.डांगे,
ऍड.एन.एस.पुजदेकर, ऍड.पैरवी कदम यांनी सहकार्य केले.
दरम्यान, शशिकांतने अत्याचार केल्यानंतर पिडीतेला गर्भधारणा होऊ नये यासाठी गर्भपाताच्या गोळ्याही खाऊ घातल्या. तरीदेखील वारंवार झालेल्या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल झाल्यांनतर एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी तातडीने आरोपीला जेरबंद केले होते.