केज दि. २७ – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात खबरदारीचे उपाय योजिले जात आहेत. कोरोना टेस्ट चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. तर व्यावसायिकांच्या कोरोना चाचण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. मात्र केज तालुक्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले असून पहिल्या दिवशी नियोजित 225 व्यावसायिकांच्या चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले संपूर्ण व्यापाऱ्यांनी कोरोना टेस्टकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
मागच्या दोन दिवसांपूर्वी तहसीलदार दुलाजी मेंढके, मुख्याधिकारी सुहास हजारे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दि.२७ फेब्रुवारी ते ६ मार्च पर्यंतचा व्यापाऱ्यांच्या कोरोना टेस्ट चा कार्यक्रम आखला होता. त्यामध्ये ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तर शहरातील व्यापाऱ्यांसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात टेस्ट ची सोय करण्यात आली होती. पहिल्या दिवशी शहरातील सुमारे २२५ व्यापाऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळी १० ते ५ या वेळेत दोघांचे अपवाद वगळता संपूर्ण व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असताना व तसे आदेश असतानाही आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे केज शहरात दिसून आले.
दरम्यान या संदर्भात तहसीलदार दुलाजी मेंडके, सुहास हजारे व डॉ.विकास आठवले यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी रविवारी सर्व व्यापाऱ्यांना वैयक्तिक नोटीस देऊन टेस्ट करून घेण्याचे सूचित करण्यात येणार असून त्यावरही त्यांनी टेस्ट नाही केली तर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करून दुकान सील करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान केज तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांनीही शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचे व कारवाई पासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.