Site icon सक्रिय न्यूज

परीक्षा ऑनलाइन द्यायची की ऑफलाइन, निर्णय विद्यार्थी घेतील……..!

परीक्षा ऑनलाइन द्यायची की ऑफलाइन, निर्णय विद्यार्थी घेतील……..!

मुंबई दि.२८ – राज्यात यावर्षी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात संबंधित विद्यापीठांनी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाकडून हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे दोन्ही पर्याय ऐच्छिक असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन, याचा निर्णय आता विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे’, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनासंदर्भातल्या नियमांचं पालन करूनच परीक्षा देता येणार आहे.

इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानुसार या परीक्षांचं नियोजन केलं जाईल’, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचा गोंधळ काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान बाकी परीक्षांसंदर्भात निर्णय झाला असला तरी शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेतल्या जाणार? याबाबत अजून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आता विद्यार्थी आणि पालक करत आहेत.

शेअर करा
Exit mobile version