केज दि.२८ – केज पोलिसांनी केज शहरातील मटका बुक्यावर आणि क्रांतीनगर, भिमानगर, साळेगाव, नांदूरघाट येथील दारू अड्यावर कारवाई केली. पोलिसांनी देशी, गावठी दारू जप्त करीत रसायन नष्ट करून मटका घेणाऱ्या दोघांना पकडले. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोनि त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार श्रीराम काळे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, जमादार दिनकर पुरी, मुकुंद ढाकणे, पोलीस नाईक धनपाल लोखंडे, मंगेश भोले, दिलीप गित्ते यांच्या पथकाने मटका बुक्यासह अवैध दारू विक्री अड्यावर कारवाई केली. केज शहरातील जुन्या सरकारी जनावरांच्या दवाखाना परिसरात चेन्नई नावाचा मटका खेळविताना सुनील शामराव माळेकर ( रा. वकिलवाडी, केज ) याला तर पंचायत समितीच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण नावाचा मटका खेळविताना सुभाष दिगांबर देशमाने ( रा. शुक्रवार पेठ, केज ) याला रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून मटक्याचे साहित्य आणि नगदी रक्कम जप्त केली.
साळेगाव येथे शाहू नथु पवार याच्या घरी छापा मारून पोलिसांनी ८ हजार ५०० रुपये किंमतीचे गावठी दारू निर्मितीचे रसायन नष्ट करून ३ हजार २०० रुपयांची गावठी दारू जप्त केली. तर त्याचा भाऊ राजाभाऊ नथु पवार याच्या घरातून देशी दारूच्या २१ बाटल्या जप्त केल्या. तसेच नांदूरघाट येथील पारधी पेढीवर छापा मारून बालाबाई बबन शिंदे या महिलेच्या घरातून २१०० रुपयांची गावठी दारू जप्त केली. शहरातील क्रांती नगर भागात संगीता राजेंद्र काळे या महिलेच्या घरी छापा मारून पोलिसांनी २४ हजार रुपयांचे ८०० लिटर रसायन नष्ट करून ७५० रुपयांची गावठी दारू जप्त केली. तसेच भीमनगर भागात छापा मारून अजय अभिमान मस्के याच्या ताब्यातील देशी दारूच्या २०० बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी स्कुटी असा ६५ हजार २०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सुनील माळेकर, सुभाष देशमाने, शाहू पवार, राजाभाऊ पवार, बालाबाई शिंदे या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.