केज दि.१ – येथे पत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या ठिकाणी पोलीसांनी छापा मारला असता त्यात चार जुगारी व मुद्देमाल पोलीसांच्या हाती लागला असून एक जण फरार झाला आहे.
केज येथील फुले नगर मध्ये पत्त्यांचा जुगार चालू असून त्या ठिकाणी काही जुगारी हे जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत पोलीसांना मिळताच दि.२८ फेब्रुवारी रोजी पोलीसांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पोलीसांनी चार जणांना ताब्यात घेतले; तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. यात पोलिसांनी नगदी ८५०० रु. व मोबाईल असा एकूण ३० हजार ५५० रु. चा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान जुगार खेळणाऱ्या मध्ये दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने ‘ते’ दोघे कोण ? याची चर्चा सुरू आहे.
केज पोलीस स्टेशनला या प्रकरणी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.