Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात एचपीएम च्या कामाचा निकृष्ट दर्जा जगजाहिर……!

केज शहरात एचपीएम च्या कामाचा निकृष्ट दर्जा जगजाहिर……!
केज दि.१ – कित्येक वर्षांपासून रखडलेले काम, वळण रस्त्याची दुरावस्था आणि अधिकाऱ्यांची मनमानी अशी एचपीएम कंपनीची ओळख  केजकारांना चांगलीच परिचयाची झाली आहे. गुणवत्ता दर्जाहीन आहे, अशी नेहमीच ओरड व्हायची. आणि त्याचाच परिचय जगजाहिर झाला असून अवघ्या पंधरा दिवसांच्या आत नालीवरील पूल जमीनदोस्त झाल्याने किती निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे याचा प्रत्यय केजकारांना आला आहे.
        मागच्या तीन ते चार महिन्यांपासून केज शहरात एचपीएम कंपनीच्या माध्यमातून राज्य रस्त्याचे काम सुरू आहे. अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे केजकर वैतागून गेले आहेत. न्यायालय, रेस्ट हाऊस समोर एका बाजूचे काम झाले असून कांही ठिकाणी अनेक ठिकाणी तडे गेले असून ठिकठिकाणी वाहनांच्या चकाऱ्या पडल्या आहेत. तर कांही ठिकाणी नाली बांधकाम ही अवघ्या एक महिन्यापूर्वी झाले आहे. मात्र सदरील काम किती निकृष्ट दर्जाचे आहे याचा प्रत्यय सोमवारी आला.
           केज – बीड रस्त्यावरील हिरो शोरूम च्या बाजूने उमरी रोड कडील वसाहतीकडे जाणारा नालीवरील रस्ता कालच वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र सोमवारी दुपारी त्यावरून एक मोकळे टिप्पर जात असताना नालीवरील संपूर्ण स्लॅब कोसळून टिप्पर नालीत कोसळले. मात्र सुदैवाने कांही जीवित हानी झाली नसली तरी कामाचा निकृष्ट दर्जा मात्र समोर आला.
         दरम्यान ज्या ठिकाणावरून अंतर्गत रस्त्याला लागावे लागते त्याठिकाणी एवढा दर्जा निकृष्ट म्हटल्यावर इतर ठिकाणी काय दर्जा असेल त्याचा विचार न केलेलाच बरा. नाली बांधकाम पूर्ण होऊन बरेच दिवस झाल्यानंतरही असे प्रकार होत असतील तर इतर घरगुती वाहनांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण कामाच्या गुणवत्तेची तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा अपघात होण्यास वेळ लागणार नाही. सदरील प्रकरणी एचपीएम चे मॅनेजर श्री.शिंदे यांच्याशी विचारणा केली असता मी पाहतो आणि पुन्हा नालीचे बांधकाम करून घेतो असे सांगितले.
शेअर करा
Exit mobile version