मुंबई दि.२ – जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी घोषणा अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता त्यावर त्यांनी उत्तर दिले.
राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आले आहेत. त्यांच्याकडून वीजबिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. यात सर्वाधिक शेतकरी भरडला जात आहे. त्याचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतीच्या कामांवरही संकट आलं आहे. त्यामुळे तात्काळ या विषयावर चर्चा घडवून आणावी आणि वीज कनेक्शन तोडणं थांबवावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यावर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही या विषयावर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.
दरम्यान यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. हा विषय ऊर्जा खात्याचा आहे. त्यावर या सभागृहात चर्चा होणार आहे. जोवर विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरघूती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.