मुंबई दि.२ – कोरोनाच्या महामारीचा लोकांनी मोठा धसका घेतला होता. मात्र मी कधीही कोरोनाला घाबरलो नाही. ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.राजभवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी भगतसिंह कोश्यारी बोलत होते.
या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील आले होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोनाचा नारा दिला होता. या नाऱ्याचा उल्लेख भगतसिंह कोश्यारी यांनी भाषणादरम्यान केला.काळजी घ्या, खबरदारी घ्या, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळा, असं आवाहन यावेळी भगतसिंह कोश्यारींनी केलं आहे.
राजभवनमध्ये सतत लोक मला भेटत राहिले. टाळेबंदीच्या काळात ही मी लोकांना भेटणे सोडले नाही. आता तर राजभवन हे लोकभवन झाले आहे. मला लोक विचारतात की तुम्ही किती लोकांना राजभवन मध्ये भेटता, तुम्हाला कोरोना होण्याची भीती वाटत नाही का? त्यांना मी उत्तर देतो की ज्यांच्या मनात करुणा आहे त्यांना कोरोना कधीही होणार नाही, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.