बीड दि.४ – शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण यांनी भाजपच्या चित्रा वाघ आणि पुण्याचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्याविरूद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. बंजारी समाजाची नाहक बदनामी आणि बंद फ्लॅट मध्ये जाऊन पूजा चव्हाणचा लॅपटाॅप आणि मोबाईल चोरल्याचा आरोप त्यांनी धनराज घोगरे या भाजप नेत्यावर केला आहे. विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपचे नेते पूजा चव्हाण आणि बंजारा समाजाची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन युवती गर्भवती होती, तिचा गर्भपात करण्यात आला, अशा प्रकारची चरित्र हनन करणारी माहिती प्रसारीत केली होती. तर, बंद फ्लाॅटमध्ये घरफोडी करून काही मौल्यवान वस्तू, लॅपटाॅप आणि मोबाईल चोरून ऑडिओ क्लिप्स, व्हिडिओसोबत छेडछाड करून पसरवत आहेत. कुटूंबानी सामुहिक आत्महत्येची धमकी देऊनही तिची बदनामी थांबवली नाही, असा आरोप संगिता चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात भाजप संजय राठोड यांच्या राजीनाम्याने संतुष्ट नसुन आणखी मोठं पाऊल उचलताना दिसत आहे. भाजपने थेट आता हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी यासाठी भाजपने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या चिंतेत वाढ होऊ शकते.