केज दि.४ – कोव्हिड लसीकरणास कांही खाजगी रुग्णालयात ही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये केज शहरातील योगिता नर्सिंग होम व बाल रुग्णालयाचाही समावेश असून आज प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
केज शहरातील योगिता नर्सिंग होम व बाल रुग्णालय हे कोरोना उपचार केंद्रही होते व आता कोव्हिड लसीकरण केंद्र म्हणूनही सुरू झाले आहे. त्यानुसार गुरुवारी केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्यक्ष लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. दत्ता चाटे, पत्रकार श्रावणकुमार जाधव, दिपक नाईकवाडे, आरोग्य कर्मचारी श्री. पाटील यांचीही उपस्थिती होती. यावेळी सैनिक महेश चोपणे व पत्रकार शिवदास मुंडे यांनी लस घेतली. तर योगिता नर्सिंग होमचे संचालक बालरोग तज्ज्ञ डॉ. दिनकर राऊत व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. हेमा राऊत यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
दरम्यान जास्तीतजास्त नागरिकांनी लस घेऊन कोरोना आजाराच्या उच्चाटनात सहभाग नोंदवण्याचे आवाहन डॉ. दिनकर राऊत यांनी केले आहे.