बीड दि.७ – भरधाव ट्रकने अॅपेरिक्षाला उडविल्याने झालेल्या अपघातात तब्बल 5 जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी आहेत. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात बीडपासून जवळच असलेल्या पांगरबावडी येथे रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडला. याच ट्रकने पुढे घोडका राजुरीजवळ एका पीकअप रिक्षासह एका दुचाकीला उडविले असून त्यानंतर हा ट्रक पलटी झाला. ट्रकचालक मात्र फरार झाला आहे.
वडवणीहून बीडकडे अॅपेरिक्षामधून काही प्रवासी येत होते. सायंकाळी सातच्या सुमारास बीडहून भरधाव वेगाने आलेल्या (ट्रक क्र.एमएच 09, सी.व्हि.9644) या ट्रकने सदर अॅपेरिक्षाला उडविले. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानूसार सदर ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत होता. आणि त्यामुळे त्याचा ट्रकवरचा ताबा सुटला. त्यातून हा प्रकार घडला. अॅपेरिक्षाला धडक देऊन भरधाव वेगाने सदर ट्रक पुढे गेला. घोडका राजुरी जवळ तलावानजीक या ट्रकने एका पीकअप रिक्षाला धडक दिली. तसेच एका मोटारसायकललाही धडक दिली आणि त्यानंतर हा ट्रक पलटला.
पांगरबावडी जवळ झालेला अपघात इतका गंभीर होता होता की, यातील पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन बालकांसह तीन महिलांचा समावेश आहे.
मयतांमध्ये शारो सत्तार पठाण, तबस्सुम अजमल पठाण, यांच्यासह रिहान अजमल पठाण (वय 8) , तमन्ना अजमल पठाण (वय 10) आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे त्याची ओळख उशीरापर्यंत पटली नव्हती तर अॅपेरिक्षाचा चालक घाटसावळी येथील सिद्धार्थ शिंदे याच्यासह जाईबाई कदम (रा.कारळवाडी), मुजीब कुरेशी, अश्विनी पोकळे (रा.देवळा) आणि गोरख खरसाडे यांचा समावेश आहे.
एकाच कुटुंबातील माय लेकींचा मृत्यु
या अपघातात शाहूनगर भागातील तबस्सुम अजमल पठाण आणि त्यांची मुले रिहान अजमल पठाण व मुलगी तमन्ना यांचा मृत्यु झाला. हे दृश्य काळजाला घरे पाडणारे होते.
दरम्यान अपघाताच्या या घटनेनंतर डॉ.मनोज घडसिंग, डॉ.अभिषेक जाधव, डॉ.संदीप पाटील आणि डिएमओ डॉ.मुंडे यांच्यासह वैद्यकीय कर्मचार्यांनी जखमींवर तातडीने उपचार सुरु केले. इतर डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले. तर काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.