बीड दि.१० – दोन-चार नव्हे तर तब्बल 19 महिने 700 कामगारांना पगारच मिळालेला नसल्याने या कामगारांनी पांगरी येथील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना आज बंद केला असून हे कामगार संपावर गेले आहेत. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे.
थकीत पगार १० दिवसांत खात्यात वर्ग करा, अन्यथा आम्ही कारखाना बंद करू, असा इशारा या कामगारांनी दिला होता. दहा दिवस लोटूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच कारखाना बंद केला असून यात वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.