मुंबई दि.१० – 2 मार्चला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास स्थगिती दिली होती. मात्र, ही देण्यात आलेली स्थगिती आता उठवण्यात आली आहे. थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठविण्यात आल्याची माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली असल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चांगलाच झटका दिला आहे.
सद्य:स्थितीत केंद्र शासनाकडून शासकीय वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण व परवानामुक्त करण्याचे धोरण असल्याचे दिसून येत आहे. महवितरणची थकबाकी जर अशीच वाढत राहीली तर ते महावितरणच्या दृष्टीने धोक्याचे ठरणार आहे. महावितरण ही जनतेची कंपनी असून तीला वाचविणे व सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोव्हीड-19 महामारीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली असून तिला वाचवणे आपल्या सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपआपल्या कार्य क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहीत करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन नितीन राऊत यांनी केले.