केज दि.११ – किराणा दुकान टाकण्यासाठी माहेरहून ७० हजार रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २१ वर्षीय विवाहितेचा तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी वर्षभर शारीरिक व मानसिक छळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील सातेफळ येथे घडली. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
डिघोळअंबा ( ता. अंबाजोगाई ) माहेर असलेल्या ऋतुजा संतोष कांदे ( वय २१ ) हिचा विवाह सातेफळ ( ता. केज ) येथील संतोष पंढरी कांदे यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर ऋतुजा हिला काही दिवस चांगले नांदविले. त्यानंतर किराणा दुकान टाकण्यासाठी आईवडिलांकडून ७० हजार रुपये घेऊन ये म्हणून पती संतोष कांदे, सासरा पंढरी कांदे, सासू चंद्रकला कांदे, नणंद सोनाली वाघ, नंदवा गोरख वाघ यांनी ऋतुजा हिला तगादा लावला. तिने आईवडीलांची तेवढी रक्कम देण्याची ऐपत नसल्याचे सांगून टाळले. त्यामुळे तिला सतत शिवीगाळ करीत उपाशी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ती माहेरहून पैसे घेऊन येत नसल्याने तिला जीवे मारण्याची धमकी ही दिली. शेवटी ऋतुजा कांदे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष कांदे, सासरा पंढरी कांदे, सासू चंद्रकला कांदे, नणंद सोनाली वाघ, नंदवा गोरख वाघ या पाच जणांविरुध्द युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.