केज दि.१५ – कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवरून जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल, पानटपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून हॉटेल व टपऱ्या उघड्या ठेवणाऱ्या केज शहरातील एका हॉटेल चालकासह सहा पानटपरी चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल आणि पान टपरी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश १३ मार्च रोजी काढले असून आदेशाचे पालन न करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार दादासाहेब सिद्धे, फौजदार श्रीराम काळे, पोलीस नाईक अशोक नामदास, दिलीप गित्ते यांचे पथक हे १५ मार्च रोजी सकाळी ११.३० ते १ वाजेच्या दरम्यान केज शहरात सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फिरत असताना
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून श्रीकांत नंदकिशोर सोनवणे ( रा. धारूर रोड, केज ) यांनी तहसील कार्यालयाच्या बाजूला पानटपरी, सचिन आनंदराव सत्वधर ( रा. धारूर रोड, केज ) यांनी शिवाजी चौकात पान टपरी, शेख सलीम सत्तार ( रा. कोकचपिर, केज ) यांनी मेन रस्त्यावर पान टपरी, आसेफ इसाक तांबोळी ( रा. समर्थ नगर, केज ) यांनी व अलताफ मोहंमद हुसेन ( रा. अजीजपुरा, केज ) यांनी बस स्थानकासमोर पान टपरी, महादेव उत्तरेश्वर देशमाने यांनी बस स्टँड पाठीमागे पानटपरी तर सय्यद मोहसीन शाकेर ( रा. शुक्रवार पेठ, केज ) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हॉटेल उघडे करून चालू ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरून वरील सहा पानटपरी चालक आणि एका हॉटेल चालकाविरुद्ध कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ( ब ), साथरोग अधिनियम कलम ३ नुसार केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.