Site icon सक्रिय न्यूज

33 हजार शिक्षकांसाठी 140 कोटी मंजूर…….!

33 हजार शिक्षकांसाठी 140 कोटी मंजूर…….!

मुंबई दि.१८ – महाराष्ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे सातत्‍याने केलेल्या पाठपुराव्‍याला यश आले असून, राज्‍यातील ३३ हजार ३०० शिक्षकांसाठी १४० कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. बुधवार दि.१७ रोजी शासन निर्णय पारीत झाला. मागची  सात वर्षे मूल्‍यांकन होऊनही अनुदान मिळत नव्‍हते. पात्र शाळा, महाविद्यालयांतील तुकड्यांकरिता निधी प्राप्त व्‍हावा, यासाठी महासंघातर्फे दीर्घ कालावधीपासून पाठपुरावा सुरू होता. अनेक वेळा बारावीच्‍या परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कारही टाकण्यात आला होता.

सदरील संघर्षाला यश आले असून बुधवारी राज्‍य शासनाने ३३ हजार ३०० शिक्षकांसाठी अनुदान मंजूर केले आहे. या शिक्षकांमध्ये ‍उच्च माध्यमिकचे आठ हजार ८२०, माध्यमिक १८ हजार ७७५, प्राथमिकचे पाच हजार ८७९ शिक्षकांचा समावेश आहे. नव्‍याने पात्र झालेल्‍या तुकड्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांना १ नोव्‍हेंबर २०२० पासून वीस टक्‍के अनुदान मिळणार आहे.

दरम्यान महासंघाच्‍या पाठपुराव्‍याला यश आले आहे. शासनाने प्रचलित पद्धतीने अनुदान द्यायला हवे होते. परंतु राज्‍यामध्ये तीस हजारांहून अधिक अर्धपोटी असणाऱ्या शिक्षकांना अनुदान जाहीर झाल्‍याने काहीसा दिलासा मिळाला आहे. शासनाने परिस्‍थिती पूर्ववत झाल्‍यावर प्रचलित पद्धतीने अनुदान जाहीर करावे. तसेच, अघोषित राहिलेल्‍या तुकड्यांनाही लवकर घोषित करून त्‍यांनाही अनुदानाचा लाभ द्यावा. यासंदर्भात लढा संपलेला नसून, यापुढेही पाठपुरावा सुरू राहणार असल्‍याचे प्रा. डॉ. शिंदे यांनी स्‍पष्ट केले.

शेअर करा
Exit mobile version