अंबाजोगाई दि.१८ – किराणा दुकानात वही आणण्याकरीता आलेल्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या किराणा दुकान मालकास मा.अपर सत्र न्यायालय 3रे, अंबाजोगाई यांनी दिनांक 18/03/2021 रोजी पाच वर्ष सश्रम करावास व 25,000/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 23/05/2017 रोजी सकाळी 10.30 वा. चे सुमारास प्रकरणातील पिडीत ही किराणा दुकानात वही आणण्याकरीता गेली असता, यातील आरोपी किराणा दुकान मालक शेख सिराज शेख मुन्सी, वय-25 वर्ष, रा.मियाभाई कॉलनी, अंबाजोगाई याने अल्पवयीन पिडीत मुलीस घरात बोलावून गुप्त भागावर अश्लील चाळे केले. पिडीता ही रडत असतांना दुकानाचे शटर वाजल्याने आरोपीने पिडीतेस सोडून दिले. अल्पवयीन पिडीत मुलीने रडत रडत घरी जाऊन घडलेला प्रकार तिच्या आईला सांगीतला. पिडीतेची आई व इतर साक्षीदार हे आरोपीस जाब विचारण्यासाठी गेले असता, आरोपीताने फिर्यादी हे अनुसुचीत जातीचे आहेत हे माहित असतांना देखील फिर्यादी व साक्षीदारास शिवीगाळ केली. घडलेल्या प्रकाराबाबत अल्पवयीन पिडीतेच्या आईने पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने प्रकरणाचे गांभीर्य पाहता सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद यांच्याकडे देण्यात आला. तपासीक अधिकारी यांनी तपासांती आरोपीताविरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा.न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर केले.
दरम्यान सदर प्रकरणाची सुनावणी मा.अपर सत्र न्यायालय ३रे, अंबाजोगाई येथे झाली. सुनावणीअंती आरोपीताविरूध्द दिसून आलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा.न्यायालाने वर नमुद आरोपीस कलम ३५४ भादंवि सह कलम ७, ८ बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनीयम व 3(1)(w)(i) अनुसुचीत जामी जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनीयम मध्ये दोषी ठरवून पाच वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे. तसचे आरोपीस 25,000/- रुपये दंड सुनावून दंडाची रक्कम फिर्यादीस देण्यात यावी असा न्यायनिर्णय पारीत केला आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहा.सरकारी वकील श्री आर. एम. ढेले यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोउपनि अर्जुन चौधर यांनी पाहिले.