मुंबई दि.19 – पुढचे चार दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मार्चच्या सुरवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवायला लागला होता. त्यात आता अवकाळी पाऊस येण्याच्या शक्यतेनं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भारतीय हवामान खात्यानं आजपासून म्हणजेच 18 ते 21 मार्च 2021 या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज असल्याचं सांगितलं आहे. तर काही ठिकाणी विजा आणि गारा पडण्याची शक्यताही हवामान खात्याने दर्शवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर ,भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आधीच विस्कळीत झालेली आर्थिक स्थिती. त्यात आता अवकाळी पावसामुळे शेतीवर होणारा परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा दुष्परिणाम होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची, पिकाची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.