Site icon सक्रिय न्यूज

चोरट्यांची नजर हायवे वरील व्यवसायावर…….!

चोरट्यांची नजर हायवे वरील व्यवसायावर…….!
केज दि.१९ – तालुक्यातील साळेगाव जवळील कळंब केज रोडवर असलेल्या एका रसवंती गृहातून सलग दोन दिवस चोरी करून फ्रीज आणि इंजिन चोरीचा प्रकार उघड झाला आहे. त्याच धर्तीवर केज – मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव फाट्यावरील एका रसवंतीचे इंजिन आणि चरखा असा ४२ हजार रुपयांच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे चोरट्यांची नजर आता हायवेवर असलेल्या छोट्या व्यवसायावर पडलेली दिसून येत असल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत.
       कोरेगाव येथील शेतकरी दादाराव यादवराव नागरगोजे हे केज – मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव फाटा येथे पत्र्याचे शेडमध्ये रसवंती चालवितात. १७ मार्च रोजी रात्री दादाराव नागरगोजे हे घरी निघून गेल्यावर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी रसवंतीचे सॅमसंग कंपनीचे इंजिन ( किंमत १८००० रुपये ) व लोखंडी चरखा ( किंमत २४००० रुपये ) असा ४२ हजार रुपयांच्या या वस्तू लंपास केल्या. नागरगोजे हे १८ मार्च रोजी सकाळी रसवंतीवर आले असता हा प्रकार उघडकीस आला. दादाराव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.
          दरम्यान साळेगाव येथील रसवंती गृहातही चोरी झाली असल्याने रात्री सदरील ठिकाणी कोणी नसल्याची संधी साधून चोरटे तेथील सामान चोरी करून नेत असल्याचे प्रकार वाढले आहेत.
शेअर करा
Exit mobile version