Site icon सक्रिय न्यूज

जमीन विक्रीच्या व्यवहारातून त्या शेतकऱ्याची आत्महत्या……! 

जमीन विक्रीच्या व्यवहारातून त्या शेतकऱ्याची आत्महत्या……! 
 केज दि.२० –  दोन एक्कर जमिन ८ लाख ५५ हजार रुपयाला विक्री केली. त्यापैकी खरेदी करणाऱ्या व्यक्तीने २ लाख ५० हजार रुपये देऊन जमीन नावावर करून घेतली. मात्र उर्वरित रक्कम देण्यास नकार देत उलट जीवे मारण्याची धमकी दिल्याने अंबिलवडगाव ( ता. जि. बीड ) येथील गणेश विठ्ठल तांदळे या शेतकऱ्याने गळफास घेऊन केज तालुक्यातील दहिफळ ( वडमाऊली ) येथे आत्महत्या केली. याप्रकरणी शनिवारी सदर जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
         अंबिलवडगाव ( ता. जि. बीड ) येथील गणेश विठ्ठल तांदळे ( वय ३५ ) या शेतकऱ्याने पत्नी आणि वडिलांच्या परस्पर साकेश वामन जाधवर ( रा. सिंधू राम हौसिंग सोसायटी, आळंदी रोड, येरवडा, पुणे ) यांच्याशी दोन एकर जमिनीचा सौदा करून ८ लाख ५५ हजार रुपयाला जमीन देण्याचे ठरले. साकेश जाधवर याने २ लाख ५० हजार रुपये देऊन ५ नोव्हेंबर २०२० रोजी खरेदी खत करून घेतले. तांदळे यांच्या वडिलांना हा व्यवहार झाल्याचे माहित होताच त्यांनी सून राणी गणेश तांदळे यांच्याकडे विचारणा केली. मात्र त्यांनी ही आपल्याला माहीत नसल्याचे सांगून पतीला विचारून सांगते असे उत्तर दिले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी पती गणेश तांदळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी जमीन विक्री केल्याचे सांगून २ लाख रुपये दिले आहेत. उर्वरित पैसे मागण्यासाठी गणेश तांदळे व त्यांची पत्नी राणी तांदळे हे साकेश जाधवर याच्याकडे गेले असता जाधवर याने जमीन लिहून घेतली, मी उर्वरित पैसे देणार नाही असे म्हणत तुम्हाला काय करायचे ते करा माझे काही वाकडे होणार नाही असे म्हणाला. त्यानंतर विठ्ठल तांदळे यांनी सुद्धा राहिलेल्या पैशाची मागणी केली, मात्र त्यांना ही तसेच उत्तर दिले. राणी तांदळे ह्या बाळंतपणासाठी माहेरी दहिफळ ( वडमाऊली ) येथे गेल्या होत्या. गणेश तांदळे हा पत्नीला भेटण्यासाठी अधूनमधून गेल्यानंतर साकेशला  जमिनीचे राहिलेले पैसे मागतोय, पण तो पैसे देण्यास नकार देत असून जमिनीत नांगर घालीन तू आडवा आला तर नांगराखाली घालेन अशी धमकी देत सांगितले. १६ मार्च २०२१ रोजी रात्री आठ वाजता पत्नीला भेटण्यासाठी आलेले गणेश तांदळे हे खूप निराश आणि परेशान दिसत होते. त्यांनी पुन्हा साकेश मानसिक त्रास आणि धमक्या देत असल्याचे सांगितले. तर १७ मार्च २०२१ रोजी सकाळी ५.३० वाजता झोपेतून उठून शौचाहून येतो असे सांगून गणेश तांदळे यांनी साकेश जाधवर याच्या जाचास कंटाळून दहिफळ ( वडमाऊली ) येथे चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. अशी फिर्याद २० मार्च रोजी राणी गणेश तांदळे यांनी दिल्यावरून साकेश वामन जाधवर याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version