केज दि.२१ – पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत सणसवाडी येथे स्कुटर व ट्रक च्या अपघातात साळेगाव ता. केज येथील ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, दि. १९ मार्च रोजी सकाळी ९ वा च्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत सणसवाडी चौकात नगर पुणे महामार्गावर स्कुटी आणि ट्रकच्या अपघातात साळेगाव ता. केज येथील भगवान देवराव गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. भगवान गायकवाड हे स्कुटी वरून रस्ता ओलांडत असताना पुण्याकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने त्यांना धडक दिली. भगवान गायकवाड हे सणसवाडी येथे वॉचमनचे काम करीत होते.
मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस स्टेशनला मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल ट्रकचा चालक गणेश शामराव गोल्हार रा. जावळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
दरम्यान भगवान गायकवाड यांच्या मृतदेहावर साळेगाव ता केज येथील सार्वजनिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भगवान गायकवाड हे गरीब आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, बहीण व भाऊ असा परिवार आहे.