केज दि.२३ – आजोबांच्या नावावरील जमीन नावावर करण्याच्या कारणावरून सख्या चुलत भावात तुंबळ हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांना लोखंडी सळईने मारहाण केल्याने दोघांचे ही डोके फुटले आहे. ही घटना विडा ( ता. केज ) येथे घडली असून याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
विडा येथील देवीलाल चंद्रकांत वाघमारे ( वय २८ ) व अतुल रावसाहेब वाघमारे ( वय ३५ ) हे दोघे सखे चुलत भाऊ असून ते मजुरी करतात. त्यांच्या आजोबांच्या नावे काही जमीन असून ही जमीन नावावर करून घेण्यासाठी त्यांच्यात २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता हाणामारी झाली. त्यांनी शिवीगाळ करीत एकमेकांना दोघांनी लोखंडी सळईने मारहाण केली. या मारहाणीत दोघांचे ही डोके फुटले आहे. त्यांनी २२ मार्च रोजी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करत आहेत.