Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात आठ दिवसांत दोन हरणांचा अपघाती मृत्यू……!

केज तालुक्यात आठ दिवसांत दोन हरणांचा अपघाती मृत्यू……!
केज दि.२६ – अगोदरच दुर्मिळ होत असलेल्या हरणांवर संक्रांत कोसळल्याने तालुक्यातील हरणांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अवघ्या आठ दिवसांत केज अंबाजोगाई रोडवर झालेल्या अपघातात दोन हरणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
           मागच्या आठ दिवसांपूर्वी केज अंबाजोगाई रोडवर कुंबेफळ चंदन सावरगाव दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरीण जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले होते. दरम्यान सदरील घटनेची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांना मिळाल्यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. तर वन विभागाच्या श्रीमती मोराळे यांनी तात्काळ गाडी पाठवून केजच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून  सदरील हरणावर उपचार केले. मात्र ते हरीण गंभीर जखमी झाल्याने तिसऱ्या दिवशी मृत्यू पावले.
          दरम्यान शुक्रवारी (दि.२६) रोजीही केज अंबाजोगाई रोडवरील कोद्री नजीक एका अज्ञात वाहनाची धडक लागून एका मादी हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अगोदरच दुर्मिळ होत असलेल्या प्राण्यांवर मानवी चुकांमुळे संक्रांत कोसळली असून सदरील प्रजाती केज तालुक्यात झपाट्याने कमी होताना दिसत आहे. सदरील प्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र भटकत असावेत. मात्र रस्ता ओलांडताना त्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागत असल्याने वन विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अन्यथा असे प्रकार वारंवार घडत गेले तर संख्या कमी व्हायला वेळ लागणार नाही.
             सदरील घटना घडल्यानंतर पत्रकार गौतम बचुटे हे अंबाजोगाई ला जात असताना त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी गाडी घेऊन तिथे पोहोचले मात्र घटनास्थळी हरीण दिसून आले नाही. त्यामुळे ते हरीण कोण घेऊन गेले याचा शोध घेतला जात आहे.
शेअर करा
Exit mobile version