Site icon सक्रिय न्यूज

केजच्या महिला डॉक्टरची राष्ट्रीय स्तरावर झेप……..!

केज दि.२८ – राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर कमावणे ही कांही फक्त शहरी भागातील लोकांचीच मक्तेदारी नाही. आवड आणि पाठपुरावा करण्याची तयारी असेल तर ग्रामीण भागातील लोकही स्वतःला सिद्ध करू शकतात. आणि हे दाखवून दिले आहे केजच्या डॉ.अंजली घाडगे आखाडे यांनी ! त्यांनी निर्माण केलेल्या ”कस्तुरी” नामक चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला असून लवकरच पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे.
           केज (जि. बीड) या ग्रामीण भागातील डॉ. अंजली राम घाडगे ह्या पुण्याला वास्तव्यास असतात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंध असल्याने पुण्यात त्यांच्यासह महिलांचा एक ग्रुप आहे. महिलांमध्ये विविध विषयांवर सतत चर्चा होत असताना त्यांनी चित्रपट निर्मिती करण्याचे ठरवले आणि इनसाईट नावाचे प्रोडक्शन हाऊस ची स्थापना 2018 मध्ये केली. पुढे चित्रपटाचा विषय निवडीच्या दरम्यान बार्शी येथील विनोद कांबळे नामक व्यक्तीचा परिचय झाला आणि कांबळे यांच्याच जीवनातील सत्य घटनेवर आधारित सिनेमा निर्माण करण्याचे पक्के झाले.
              सदरील सिनेमाचा विषय हा त्यांच्याच जीवनावर आधारित असून कांबळे यांचे वडील हे  सफाई कामगार म्हणून नौकरीला असताना विनोद कांबळे हे तेंव्हा लहान होते. मात्र विनोद यांना कांही अस्वच्छ कामे करावी लागत. परंतु अस्वच्छ कामे करावी लागत असल्याने त्यांचा अंगाची दुर्गंधी येत असल्याने त्यांचे समवयस्क मुले त्यांना चिडवत असत. मात्र त्या दरम्यान दुर्गंधी येऊ नये म्हणून कांबळे यांनी कुणीतरी सोबत कस्तुरी ठेवण्याचा सल्ला दिला अन मग ती कस्तुरी मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्याचे चित्रण कस्तुरी नामक दीड तासाच्या आर्ट फिल्म मध्ये दाखवण्यात आले आहे.
           दरम्यान सदरील चित्रपट निर्मितीमध्ये डॉ. अंजली घाडगे आखाडे यांच्यासह इतर आठ महिलांचा सहभाग असून त्या निर्मात्या आहेत. तर यातील कलाकार विनोद कांबळे हे स्वतः दिग्दर्शक आहेत. विशेष म्हणजे यातील सर्वच कलाकार हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील असून सिनेमाचे चित्रीकरण ही बार्शी शहरातच झालेले आहे. चित्रपटाची कथा ही सामाजिक विषयावर असल्याने सदरील बाल चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे.
            सदरील क्षेत्रातील पहिल्याच प्रयत्नात डॉ. अंजली घाडगे यांनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्याने व कस्तुरी चा सुगंध सर्वत्र दरवळल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
शेअर करा
Exit mobile version